श्री. रविंद्र लाड यांना गिरिमित्र संमेलनातर्फे श्रद्धांजली


स्व. रविंद्र लाड

एखाद्याने केवळ हौस, छंद, आवड यातूनच वेगवेगळ्या विषयांचा ध्यास घ्यावा, त्या क्षेत्रांमध्ये निष्ठा आणि निस्वार्थीपणे झोकून द्यावे असे व्यक्तीमत्व म्हणजे रविंद्र लाड. इतिहास अभ्यासक, संशोधक, संगिताचे जाणकार आणि गिरिमित्र असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाड सर. लौकिकार्थाने लाडांनी इतिहासाचे पुस्तकी शिक्षण कधीच घेतले नव्हते. आवड अगदी महाविद्यालयीन काळापासूनच. पण घारापुरीतील आपल्या वडीलोपार्जित घरामुळे त्यांचा खरं तर या क्षेत्राशी त्यांचा प्रथम संबंध आला. घारापुरी बेटावर सापडलेल्या एका पुरातन नाण्यामुळे ते इतिहासाकडे आकर्षिले गेले आणि त्यातच पुरते बुडुन गेले.

पोटापाण्यासाठी खासगी कंपनीत नोकरी सुरु होतीच, पण त्यातून मिळणारा वेळ त्यांनी इतिहासाचा वेध घेण्यात व्यतित केला. महाविद्यालयीन काळापर्यंत ते मुंबईतल्या माहूल आणि वडाळा येथे राहायचे, त्यानंतर मुलुंड येथे आले आणि येथेच स्थायिक झाले. येथेच त्यांची ओळख दोन महत्वाच्या संस्थांशी झाली. महाराष्ट्र सेवा संघ आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून लाड सरांनी गेल्या तीस वर्षात प्रचंड काम केले.

नाणेशास्त्र हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि हक्काचा विषय. घारापुरीत सापडलेल्या नाण्यांचा त्यांनी कसून अभ्यास केला. पण केवळ घारापुरीपुरतेच मर्यादीत न राहता त्यांनी नाण्यांच्या आधारे कोकणचा अभ्यास सुरु केला. शेकडो नाणी जमवली. त्याचबरोबर खापरांचा अभ्यासदेखील सुरु झाला. जोडीला ब्राह्मी लिपी लिहायला-वाचायला शिकले.

त्यातूनच मग टॉलेमीच्या प्राचीन नकाशातील डुंगी बंदराचा मागोवा व नव्याने शोध, रोमच्या पूर्वेकडील बायझनटाईन शहर आणि महाराष्ट्राच्या सागरी व्यापारावरील संशोधन, बायझनटाईन सम्राटावरील नाण्यांचा शोध, चालुक्यांच्या ‘राजा धराश्रय’ आणि ‘अनंगाश्रय’ यांच्या नाण्यांचा शोध असे संशोधन केले. कोकणच्या मौर्य राजसत्तेची नाणी त्यांनी प्रकाशात आणली. कोकण मौर्यांचा ‘सिंह विक्रमांक राजा’ उजेडात आणण्याचे काम त्यांनी प्रथम केले.

मुंबईवरदेखील लाड सरांचे खूप प्रेम होते. मुंबई बेटावरील प्राचीन गावांच्या नावाचा आणि स्थलांतराचा इतिहास, नवी मुंबईतील प्राचीन गुंफेचा शोध त्यांनी घेतला. आजवरच्या अभ्यासातून विविध विषयांवरील सुमारे १५ हून अधिक शोधनिबंध त्यांनी लिहले असून ते अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेत प्रसिद्ध झाले आहेत. न्यूमिसमॅटिक इन्स्टिट्यूट, पंजाबराव देशमुख यांचे शिवाजी लोक विद्यापीठ अशा संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत उचित गौरव केला आहे.

पण केवळ शोध निबंधापुरते न थांबता त्यांनी विविध व्यासपीठांवरुनदेखील आपली मते कायम मांडली, अनेकांना सतत मार्गदर्शन केले. अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहीकांतून त्यांनी भरपूर लिखाण केले. पुढे कोकण इतिहास परिषदेशी ते आपसूकच जोडले गेले. गेली चार वर्षे ते या परिषदेचे अध्यक्षपद भूषवित होते.

आपल्या विविध अभ्यासांवर पुस्तक लिहण्याचा त्यांचा संकल्प होता. ‘कोकणातील कातळशिल्पे’ हे पुस्तक २०१८ मध्ये प्रकाशित झाले. मात्र त्यापूर्वी सुमारे दहा वर्षे त्यांनी कोकणात भरपूर भटकंती केली. गेल्या दोन एक वर्षात कातळशिल्पांवर भरपूर लिहलं बोललं जात आहे, पण लाडांनी याचा अभ्यास केव्हाच सुरु केला. अनेक संदर्भ, टिप्पणे, रेखाटने असे करत हे छोटेखानी पण माहितीपूर्ण पुस्तक त्यांनी प्रकाशित केले.

दरम्यानच्या काळात गोपाळ बोधे यांच्या सुंदर छायाचित्रांनी नटलेल्या ‘कोल्हापूरची महालक्ष्मी - एक शक्तीपीठ’ आणि ‘महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग’ या दोन पुस्तकांची मूळ मराठी संहिता लाडांनी तयार केली. त्यावरुन या पुस्तकांचे इंग्रजी लिखाण झाले. तर ‘कोल्हापूरची महालक्ष्मी-एक शक्तीपीठ’ हे पुस्तक मराठीतदेखील अन्य लेखकांबरोबर प्रकाशित झाले. याशिवाय ‘घारापुरी बेटाचा पुरातत्वीय शोध’ आणि ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी’ या पुस्तकांचे काम सुरु होते. इतिहास परिषद आणि सेवा संघाबरोबरच लाड सरांचा इतरही काही संस्थांशी संबंध आला. मुलुंडमधील मराठा मंडळाचे ते ज्येष्ठ सभासद होते. तसेच मंडळाच्या ग्रंथालय आणि अभ्यासिका समितीचे सदस्यदेखील होते. कामगार नाटक चळवळीचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. त्यावरदेखील त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

इतिहास अभ्यासक म्हणजे सनावळी आणि कागदपत्रांमध्ये गुरफटलेला माणूस. पण लाडांना संगिताची आवड आणि जाण होती. महाराष्ट्र सेवा संघात त्यांनी कला विभागात रुची घेतली आणि ते त्यामध्ये रमलेदेखील. कला विभागातर्फे संगित विषयक कार्यक्रम करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. कला विभागाचे कार्यवाह, अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी नेटाने पेलल्या. त्याशिवाय सेवा संघाच्या कर्जत येथील आरोग्य केंद्रावरदेखील त्यांच्या नियमित भेटी व्हायच्या. सेवा संघाचे ग्रंथालय वगैरे सर्वच उपक्रमात ते अतिव उत्साहाने सामील होत.

कला विभागाच्या अंतर्गत त्यांनी एका वेगळ्या विषयालादेखील वाव दिला... गिरिमित्र संमेलन. गिर्यारोहण हा जसा चौकटीबाहेरील विषय तसाच तो कला विभागाच्यादेखील चौकटीबाहेरचा. पण लाडांच्या मनात हा विषय घर करुन होता. गिर्यारोहकांनी, डोंगरभटक्यांनी, किल्लेप्रेमींनी एकत्र यावे यासाठीचा हा अनौपचारीक कार्यक्रम. लाडांनी पुढाकार घेत गिरिमित्र जमा केले आणि सेवा संघाच्या व्यासपीठावर 2002 पासून गिरिमित्र संमेलन दरवर्षी होऊ लागले. अनेक संस्था एकत्र आल्या आणि उत्तरोत्तर संमेलन अधिकच रंगू लागले. गिर्यारोहण क्षेत्रात गिरिमित्र संमेलनाने स्वत:चे अढळ असे स्थान निर्माण केले.

खरे तर लाड सरांना इतिहासाची आणि पर्यायाने किल्ल्यांची आवड अधिक. पण संमेलनातील प्रत्येक विषयाला त्यांचा सक्रिय पांठिबा असे. संमेलनातील त्यांचा सहभाग एखाद्या गिर्यारोहकाइतकाच उत्साही असायचा. मात्र हे सर्व पडद्यामागूनच. नवोदीतांना प्रोत्साहन देण्यात त्यांचा कायमच पुढाकार राहिला. लाड सर सर्व संस्थांमधील दुवा व्हायचे. सर्वांच्या आग्रहाने त्यांनी दहाव्या गिरिमित्र संमेलनाचे प्रमुखपद स्वीकारले, त्यावेळी एकदाच ते व्यासपीठावर आले. सेवासंघाच्या सहकार्याने गिरिमित्र संमेलनाची ज्या जोमाने वाढ झाली, त्यामध्ये लाड सरांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. उत्तरोउत्तर लोकप्रिय झालेला हा उपक्रम म्हणजे लाड सरांची संपूर्ण गिर्यारोहण विश्वाला देणगीच म्हणावी लागेल.

गेली 18 वर्षे गिरिमित्र संमेलन दिमाखात होत आहेच, पण त्याचजोडीने आता सेवा संघात ‘गिरिमित्र विभाग’देखील सुरु झाला आहे. विभागाद्वारे वर्षातून आणखीही कार्यक्रम केले जात आहेत, त्यामध्ये लाडांचा सहभाग असतोच.

उत्तम संगीत ऐकावे, चांगले वाचावे, नवनवीन खाद्यपदार्थ चाखावेत आणि भरपूर भटकावे असा हा स्वच्छंदी पण नेकीने जगलेला माणूस. प्रचंड वाचन, भरपूर जनसंपर्क, सतत उत्साहाने काही तरी करण्याची धडपड असे एक उत्स्फूर्त आयुष्य रविंद्र लाडांनी अनुभवले. सुमारे 40 वर्षे सतत कार्यरत असलेले लाड सर आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी केलेल्या कामांमुळे ते कायमच आपल्यासोबत सतत राहतील.

---समाप्त---