गिरिमित्र संमेलनाविषयी

गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो. चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे होते. पूर्वी असे काही प्रयत्न झाले होते, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते.

महाराष्ट्रात गिर्यारोहकांच्या जवळपास दीड दोनशे संस्था आहेत आणि हजारो गिर्यारोहक गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. या सर्वाना एकत्र आणणे तसे कठीण काम होते. पण त्या बाबतीत पुढाकार घेतला मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने आणि गिर्यारोहाकांशी झालेल्या संवादातून गिरिमित्र संमेलनाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले ते सेवा संघाच्या श्री. चंद्रशेखर वझे, श्री. रवींद्र लाड, श्री. डी व्ही कुलकर्णी, श्री अरुण भंडारे आणि प्रदीप नाटेकर आदी प्रभूतीनी. एकत्र येण्याची संकल्पना जरी पटली असली तरी एकत्र येऊन काय करावे याचा आराखडा नव्हता. तेव्हा धनंजय मदन, प्रदीप केळकर, प्रशांत ठोसर, गिरीश जाधव, समीर परांजपे आदी मंडळी वारंवार भेटू लागली. डोंगरात विविध कारणांनी भटकंती करणा-या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असे सर्वसमावेशक कार्यक्रम करायचे ठरले. या सर्व संकल्पनांना आणि भटक्यांना एकत्र आणून संमेलनास मूर्त स्वरूप देण्यात श्री हृषीकेश यादव यांची भूमिका महत्वाची ठरली. दिशा ठरली पण नाव ठरले नव्हते, महाडच्या डॉ राहुल वारंगे यांनी “गिरिमित्र संमेलन” हे नाव सुचविले आणि पहिल्या संमेलनाची तारीख ठरली.

दिनांक १४ जुलै २००२ रोजी डोंगरवेड्यांचे अनोखे संमेलन मूर्त स्वरूपात साकार झाले. सुरुवातीस संमिश्र प्रतिसाद मिळाला. संमेलनाची संकल्पना, आखणी, आयोजन सर्वांनी मिळून केले होते. परिसंवाद, दृकश्राव्य सादरीकरण, मुलाखत असे याचे स्वरूप होते. दुस-या संमेलनापासून ठराविक एक संस्था जबाबदारी घेऊन संमेलनाचे आयोजन करू लागली. संमेलनासाठी दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्याआधारे कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले.

‘गिर्यारोहणातील नवीन वाटा’, ‘महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची ५० वर्षे’, ‘गिर्यारोहणातून अभ्यास’, ‘सह्याद्री’, ‘संस्थात्मक गिर्यारोहणाचा रौप्य महोत्सव’, ‘गिर्यारोहणातून संवर्धन’, ‘गिर्यारोहण आणि सामाजिक बांधिलकी’ आणि ‘चरण वै मधु विदन्ति’ अशा मध्यवर्ती संकल्पनांवर आजवरची संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. यातूनच संमेलनाची व्याप्ती वाढू लागली. सुरुवातीची तीन चारशेची संख्या ६०० चा आकडा ओलांडू लागली. गिर्यारोहकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

दरवर्षी संमेलनात काही ना काही नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर पडत होती. तिस-या वर्षापासून गिर्यारोहण मोहिमा, गड-किल्ले, निसर्गावलोकन अशा विषयांच्या दृकश्राव्य सादरीकरणाच्या स्पर्धा होऊ लागल्या. या अनोख्या स्पर्धेमुळे गिर्यारोहकांचा कार्यक्रमातील प्रत्यक्ष सहभाग वाढला आणि पर्यायाने गिर्यारोहणाचे, गड किल्ल्याचे डिजिटल दस्तऐवजीकरण होऊ लागले. खास स्पर्धेसाठी गिर्यारोहक आरोहणे करू लागले, तर नेहमीच्या गड किल्ल्यांवरील भटकंतीचे व्यवस्थित चित्रीकरण होऊ लागले. आजवर सुमारे ५० हून अधिक फिल्म्सचा या स्पर्धेत सहभाग झाला आहे.

चौथ्या संमेलनापासून तर मध्यवर्ती संकल्पनेचा आढावा घेणा-या फिल्म्स तयार होऊ लागल्या. गिर्यारोहणाच्या ५० वर्षाचा आढावा, सह्याद्रीची जीवनगाथा, सामजिक बांधीलीकी जोपासणा-या संस्थांच्या कार्याचा आढावा असे विशेष दस्तऐवज यातून तयार झाले आहेत. त्यामुळेच गिर्यारोहण क्षेत्रातील आजवरच्या कामगिरीची काही प्रमाणात तरी व्यवस्थित नोंद झाली असे म्हटले तर अतिशोयक्ती होणार नाही. अशा विविध उपक्रमांमुळे संमेलनाची ख्याती सर्वदूर पसरली. अनेक मान्यवर व्यक्ती संमेलनास उपस्थितीस राहू लागल्या. कानचेनजुंगा या तृतीय क्रमांकाच्या हिमशिखरावरील पहिल्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व कर्नल एन कुमार, भारतीय गिर्यारोहण शिखर संघटनेचे अध्यक्ष मेजर एच पी एस अहलुवालिया, माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम, केसरी टुर्सचे श्री. केसरीभाऊ पाटील, पुरातत्व खात्याचे माजी संचालक श्री. अरविंद जामखेडकर, श्री. उद्धवजी ठाकरे, ब्रिगेडीअर अशोक ऑबे, कर्नाटकचे मुख्य वन्यजीव संरक्षक श्री जयकुमार, इतिहास तज्ञ श्री निनाद बेडेकर अशा अनेक मान्यवरांनी आजवर संमेलनात सहभाग घेतला आहे.

चौथ्या संमेलनापासून गिरिमित्र सन्मान प्रदान करण्यात येऊ लागले. गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्ती व संस्थांचा गौरव होऊ लागला. जीवन गौरव, गिरिमित्र गिर्यारोहक, गिरिमित्र सामाजिक बांधिलकी तसेच प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणारा उत्कृष्ट गिर्यारोहक व प्रस्तरारोहक असे सन्मान देण्यात येऊ लागले. पाचव्या संमेलनापासून छायाचित्रण स्पर्धादेखील घेण्यात येऊ लागल्या. दरवर्षी किमान ५०० छायाचित्रे यासाठी येऊ लागली. विविध माहितीपर पुस्तिका, नवीन उपक्रमांसाठी विशेष वेळ, खास हार्डकोर भटक्यांसाठी गिरीमित्र संध्येचे आयोजन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात सादर होऊ लागले. डोंगर, गड किल्ले आणि अनुषंगिक अशा अनेक विषयांना वेळ देत संमेलन यशस्वी घोडदौड करू लागले.

यंदाचे हे दशक पूर्तीचे संमेलन आणखीन मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य असे साजरे करण्याचा मानस आहे. दोन्ही पाय अपघातात गमावल्यानंतर देखील सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर यशस्वी आरोहण करणारे ज्येष्ठ गिर्यारोहक मार्क इंग्लिस, एव्हरेस्टवर तब्बल २० वेळा विक्रमी आरोहण करणारे अपा शेर्पा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असे मान्यवर दहाव्या संमेलनाला उपस्थितीत राहणार आहेत. हा जगावेगळा खेळ समाजात सर्वदूर जावा यासाठी या मोठ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे.

गिरिमित्र संमेलन म्हणजे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचे, दुर्गप्रेमींचे एक हक्काचे ठिकाण बनले आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम निस्वार्थी भावनेने, स्वत:च्या खिशाला खार लावून सर्व संस्था मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने यशस्वी करीत आहेत. आयोजक संस्थेच्या नावाचा कोणतीही जाहिरात न करणारे असे हे एखादेच संमेलन असावे. महाराष्ट्र सेवा संघाच्या भक्कम पाठबळावर आज संमेलन नवनवीन क्षितिजे सर करीत आहे.

संमेलन अहवाल

संमेलन स्मरणिका

महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाची 50 वर्षे