सन १९३७, विजयादशमीच्या मुहूर्तावर मुलुंडमधील काही होतकरू हौशी तरुण मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक सांस्कृतिक कार्याचे एक छोटेसे रोपटे लावले. धार्मिक उत्सव साजरे करणे, प्रत्येकाच्या अन्य कार्यातील अडचणी दूर करणे व सर्वांनी एकत्र व्हावे असे अगदी साधे सोपे उद्दिष्ट या संस्थेच्या स्थापनेत होते. जसजसे कार्यकर्ते जमत गेले तसतशी अनेक नवनवीन उपक्रमांची यामध्ये भर पडत गेली आणि आज या रोपट्याचे महाकाय अशा वटवृक्षात रुपांतर झाले.
आज महाराष्ट्र सेवा संघ हि सांस्कृतिक, सामाजिक व कला क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते. भव्य व सुसज्ज असे ग्रंथालय, साहित्य, नाटक व संगीत विषयक कार्यक्रमांची रेलचेल, विज्ञानविषयक कार्यक्रम, गिरीमित्र संमेलन, व्याख्यानमाला, आरोग्य शिबिरे आणि अर्थविषयक कार्यक्रम असे असंख्य उपक्रम आज महाराष्ट्र सेवा संघातर्फे मोठ्या उत्साहात यशस्वीपणे राबविले जात आहेत.